चित्रमय शैलीतील ही कादंबरी प्रामाणिक आणि पारदर्शी आहे. संवादात्मकता हा निवेदनाचा विशेष. जनावरांच्या डॉक्टरचं जीवन यापूर्वी मराठी साहित्यात सहसा आलेलं नाही.
भारत सासणे
कथाकार, नाटककार, अनुवादक, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष,
बाल साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त
मराठी साहित्यविश्वात अद्यापपावेतो न प्रकटलेले, पशुवैद्यक क्षेत्रात कार्यरत असलेल्या, ‘ढोर डॉक्टरां’चे विश्व साकार. अस्सल वऱ्हाडी भाषेच्या खाचाखोचा, म्हणी, वाक्प्रचार यांच्या सहज व नेमक्या उपयोजनाने या कादंबरीला आगळे पोत प्राप्त झालेले आहे. व्यक्तिचित्रे, घटनांचा प्रवाही वेग आणि वास्तवचित्रणातील अस्सलपणा यांमुळे ही कादंबरी केवळ वाचनीयच नाही, तर वैशिपूर्णही ठरते.
प्रभा गणोरकर
कवयित्री, समीक्षक, संपादक
ही कादंबरी वाचताना मन एका अनोख्या विश्वात गढून गेलं ... ‘पीळ’ची गोष्ट विलक्षण हृद्य आहे. म्हशीच्या देह-धर्माविषयी वाचताना मनात येतं ... बाळंतपण म्हशीचं काय नी बाईचं काय ...! लेखकाचं सगळं गुरेवैद्यकीय ज्ञान अनुभवताना मन नम्र होऊन जातं. ‘पीळ’ ही मराठी वाङ् मय विश्वातील एक अपूर्व-अनोखी वाङ् मयकृती होय.
प्रेमानंद गज्वी
नाटककार, अ. भा. मराठी नाट संमेलनाध्यक्ष, ‘बोधी’ नाट चळवळीचे प्रवर्तक
सृष्टीच्या अंतर्विश्वात अस्तित्वात असणारे असंख्य पीळ शोधण्याची आकांक्षा बाळगून, एक कल्पित व्यूह उभा करून, हा लेखक एक विधान शोधण्यासाठी, स्वतःला पिळवटून काही शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रवासाचे मूर्त रूप म्हणजे ही कादंबरी. यशस्वी कलाकृती ज्या मूलभूत घटकांची मागणी करत असते, ते सारे घटक नैसर्गिकपणे येथे संचार करतात, हेच ‘पीळ’ कादंबरीचे महत्त्वाचे योगदान आहे.
राजन गवस
प्रभावी दृश्यमय वर्णने, उभी केलेली छोटा खेडेगावाची पार्श्वभूमी, त्याला साजेसा बोलीचा वापर करणारी त्या मातीतली पात्र, त्यांचे टिपलेले वैशिपूर्ण स्वभाव, महानगरात राहूनही खेडेगावात पाळेमुळे रुजलेल्या पात्रांचे वेगळेपण, नागरी आणि ग्रामीण पात्रांच्या संवादातून अर्थ उलगडत जाणारे बोलीतील शब्द, त्यांचे अर्थ, अशा घटकांमधून या कादंबरीतील मांडणी परिणामकारक आणि प्रभाव साधणारी झालेली आहे.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
कवी, समीक्षक
मराठी साहित्यातील मोठी घटना, असं विधान मी करतो आहे, याचं कारण ‘पीळ’ कादंबरीचा अतिशय अनोखा विषय. पशुवैद्यकाच्या विश्वात इतके ताणतणाव असतील, सुन्न करून टाकणारे क्षण अनुभवावे लागत असतील, याविषयी वाचक अनभिज्ञ असतो. आचार्य अगदी पहिल्या पानापासूनच वाचकांना एका वेगळ्याच विश्वात नेतात.
सतीश नाईक
चित्रकार, संपादक ‘चिन्ह’
मानवी मनात चाललेल्या सकारात्मक-नकारात्मक अशा द्वंद्वांचे सूचन या लेखनातून होते. खाउजा संस्कृतीतून झालेला हा कोसळ मानवी मनाच्या हळुवार अशा भावविश्वातही रुजतो आहे.
दा. गो. काळे
कवी, संपादक, समीक्षक
केवळ दोन दिवसाच्या कालावकाशात घडणाऱ्या घटना यात येतात. हे सर्व इतक्या वेगाने घडत जाते की, वाचक हा विस्मयचकित होऊन जातो. हे सर्व सांगत असताना लेखकाच्या कथनशैलीची पकड एक क्षणही ढिली होत नाही. कादंबरी हातात घेतल्यानंतर खाली ठेवू वाटत नाही. ‘पीळ’ मध्ये तर मला चित्रपटाचे ‘पोटेंशियल्स’ दिसतात! त्यामुळे ह्या कादंबरीवर आधारित एक श्रेष्ठ दर्जाचा चित्रपट होऊ शकेल असे वाटते.
डॉ. दीपक बोरगावे
अनुवादक, समीक्षक
जनावरांबद्दल असलेली मानवी तटस्थता, जनावरांची माया-ममता यांची मांडणी आणि मानवी व्यक्तींमध्ये आढळणारी मानसिकता यांची सहजपणे घातलेली सांगड अतिशय प्रभावीपणे या लेखनात वाचायला मिळते.
डॉ. नीलकांत कुलसंगे
नाट्य दिग्दर्शक, साहित्यिक
ही कादंबरी जरी वैदर्भीय पार्श्वभूमीवर लिहिली गेली असली, तरी यातील समस्या, वर्तन व भावना या मूलभूत आहेत. संपूर्ण जीवसृष्टी कवेत घेणाऱ्या आहेत. प्रादेशिक सीमा उल्लंघून ही कादंबरी वाचकाला अंतर्मुख करील, यात शंका नाही.
राजश्री फडके
समीक्षक, इंग्रजी व संस्कृत साहित्याच्या अभ्यासक
मुख्य कथा सांगतांना लेखकाने ग्रामीण भागातील परिस्थिती मोठा खुबीने मांडली आहे. पात्रांच्या स्वभावातील विविध पैलू, ग्रामीण लोकांच्या तोंडून निघणारे अनुभवजन्य तत्त्वज्ञानाचे फार सुंदर दाखले या कादंबरीत आले आहेत. डॉ. आचार्य यांनी जवळपास २५ वर्षे या कादंबरीसाठी कष्ट घेतले याची मला कल्पना आहे. या कष्टाचे फळ म्हणजे ही अनमोल कादंबरी ‘पीळ’!
डॉ. गजानन दि. अंजनकर
पशुवैद्यकीय तज्ज्ञ
दीर्घकाळ टिकणारा, अस्सल, अस्वस्थ अनुभव देणारी कादंबरी म्हणून ‘पीळ’ वाचकांच्या लक्षात राहील.
रविमुकुल
चित्रकार, लेखक
वैदर्भीय अवकाशातील ‘पीळ’ ही कथा आहे एक मूक दुःखाचा डोह. ग्रामीण बोलीभाषा, परिसर, घटना, तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञानात्मक संवाद आणि पात्रे या सर्व गोष्टी एकप्रकारे रूपक आहेत, अशी जाणीव कायम अधोरेखित होत राहते. त्यातून वैदर्भीय मिथकांचा रूपकात्मक आविष्कार म्हणून ‘पीळ’ या समकालीन कथेचे वेगळेपण दिसून येते.
भरतसिंग पाटील
समीक्षक, कवी, चित्रकार
जनावरे-माणसे, माणसे-माणसे यांच्या विविध भावस्वरूपी नात्यांची गुंफण-उसवण आणि गुंता. कचाटात सापडलेले आशयविश्व या कादंबरीतून भावप्रत्ययी बनते. दु:ख, अपमान, भय, शोषण यांचे पीळ उलगडता-उलगडता अधिक घट्ट होतात, मोकळे होता होता स्मृतिबद्ध होऊन जातात. संभ्रमित मनोविश्व, दहशतीचे भयगंड या पार्श्वभूमीवर जन्मपूर्व घटिते, जन्म-मृत्यू, स्त्रीरूप-मातृरूप यांचे हळवे सर्जक पण दुखरे क्षण, सुटकेचे तीव्रकठोर संघर्षक्षण, नाटात्म प्रयत्नांचे क्षण जीवनेच्छांची प्रतीकरूपे ठरतात. बहुविध आशयसूत्रे, वास्तवाचे कल्पक संघटन, पशुवैद्यकीतले अनोखे भावदर्शन येथे होते. ते जिवाला घोर लावणारे क्षण, सुटका होता होता शोकात्म जीवनाचे पीळदार-दळदार दर्शन घडवून जातात.
अेकनाथ पगार
गतिमान कथानक, त्याला जोडलेली उपकथानके, सोपी भाषा, वऱ्हाडी बोलीचा चपखलपणे केलेला वापर ही या कादंबरीची ठळक वैशिष्टे म्हणता येतील. ‘पीळ’ ही एक लक्षवेधी कादंबरी आहे, हे निश्चित!
नामदेव कोळी
कवी, संपादक ‘वाघूर’
कादंबरीचे कथानक खिळवून ठेवणारे आहे. आचार्यांनी प्रसंगा-प्रसंगांचे बारकावे अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने टिपले आहेत. भाषाही अगदी साजेशी वऱ्हाडी आहे. बोली भाषेचा वापरही लक्षणीय आहे.
डॉ. विमल भालेराव
लेखिका, मराठी साहित्याच्या अभ्यासक
पशुवैद्यकीय सारख्या वेगळ्या व दुर्लक्षित क्षेत्रावर मेहनत घेऊन लिहिलेली कादंबरी. अशा प्रकारची मराठीतील ही पहिलीच कादंबरी असावी. अभ्यासपूर्ण लिखाणाला लालित्याची जोड लेखकाने दिली आहे. ग्रामीण भाग, तेथील पशू, त्यांच्यावर उपचार करणारे पशुवैद्य व तेथील लोकजीवन यांचे बारकावे फार सुंदररित्या यात टिपले गेले आहेत. पशुवैद्यकीयशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही कादंबरी निर्दोष आहे.
डॉ. विनया जंगले
लेखिका, पशुवैद्यकीय तज्ज्ञ
Peel: A Novel | पीळ (कादंबरी)
Ordering from outside India? Please click here