“दिलीप जगताप यांची नाटके ‘कॉपर कॉईन’तर्फे येताहेत ही एक आनंदाची बातमी. साठोत्तरी नाटककारांच्या नंतर मराठीत सत्तरत्तरी नाटककारांची एक पिढी पुढे आली ज्यांनी विजय तेंडुलकर, चि. त्र्यं. खानोलकर यांच्यांनतर मराठी नाटकाचा वारसा पुढे नेला. त्यात वृंदावन दंडवते, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, अच्युत वझे ह्यांच्या तोडीस तोड काम केले ते दिलीप जगताप यांनी. त्यांचा नाट्यप्रवास अस्सल ग्रामीण इथॉसला सहज पेलत, अस्तित्त्ववादाला इंडियन सिच्युएशनची ॲब्सर्डिटी पुरवत झालेला एक उत्कट सोहळा आहे. प्लॉटविरहित बांधणी हे ॲब्सर्ड नाटकाचे वैशिष्ट्य त्यांच्या नाटकात प्रगटत राहिलं. तेंडुलकरांना प्लॉटला कधीच पूर्ण तिलांजली देता आली नाही. काहीवेळा तर आळेकरही प्लॉटबद्ध लिहीत राहिले, पण जगतापांनी त्यावर मात करण्याचा जेन्युईन प्रयत्न केला. दुर्दैवाने मराठीतील अकादमीक लोकांना त्यांची अचिव्हमेंट दिसली नाही. ते आणि वृंदावन दंडवते दोघेही मराठी नाटकातील देशीवादाचे उत्तम उदाहरण. मी ज्या देशीवादाला अस्तित्वकेंद्री देशीवाद म्हणतो त्याची सुरुवात चित्रे, कोलटकर यांच्या कविता, नेमाडेंची ‘कोसला’ व भाऊ पाध्येंची ‘वासूनाका’ आणि तेंडुलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ पासून होते. पुढे नेमाडे वास्तववादाकडे वळल्याने समस्त देशीवादी चळवळ वास्तववादी होत गेली आणि अस्तित्वकेंद्री देशीवाद मागे पडला. त्याचा फटका विलास सारंग, दिलीप जगताप आणि वृंदावन दंडवते ह्यांना बसला. असो. दिलीप जगतापांची ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत आता नाटके छापून येत आहेत त्यांचे स्वागत. आता तरी जगतापांना न्याय मिळेल ही अपेक्षा.” श्रीधर तिळवे नाईक कवी, समीक्षक
top of page
bottom of page

